इतिहास :-
इ स पूर्व तिसऱ्या शतकात अशोक मौर्यांच्या कारकिर्दीत सोपारा (आत्ताचे नाला सोपारा) हे मौर्य साम्राज्याचे मोठे बंदर होते. तेथे सापडलेल्या अशोकाच्या शिलालेखात त्याने अपरान्तात (म्हणजेच कोकणात ) बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता धर्ममहामात्र पाठविले असा उल्लेख आहे. सागरामुळे उत्तर कोकणचा केवळ परदेशी व्यापार व तेथील नाविक हालचाली वाढल्या असे नाही तर प्राचीन रायगड जिल्ह्याच्या परिसरातील प्रदेश खुष्कीच्या मार्गानेही व्यापाराकरिता जोडले गेले.
अशोक मौर्यांच्या काळात उत्तर कोकणात बौद्ध धर्म प्रसार व बौद्धांच्या वसाहती झाल्या व पुढे त्या वाढल्या हे येथील अनेक बौद्ध लेण्यांवरून स्पष्ट होते. महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणे उत्तर कोकणातील लेणीदेखील व्यापारी मार्गावर आढळतात. यावरून व्यापार व बौद्ध लेणी एकमेकास पूरक व पोषक असल्याचे सिद्ध होते. राजपुरी खाडीवरील प्रसिद्ध प्राचीन मांदाड बंदराजवळ कुडा लेणी म्हणून प्रसिद्ध असलेली इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून चौथ्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील सव्वीस लेणी आहेत.
हि लेणी शैलकृत लेणी समूहातील आहेत. येथे दोन स्तरांत कोरलेली सव्वीस शैलकृत लेणी व अकरा पाण्याची टाकी आहेत. लेणी क्रमांक १ ते १५ खालील स्तरावर तर उर्वरित लेणी साधारणतः १२ मीटर उंचींवरीन दुसऱ्या स्तरावर आहेत. येथे ५ चैत्यगृह आणि अन्य विहार आहेत. लेणी क्र ६ हे सर्वात मोठे चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाच्या मंडपाच्या भिंतींवर मिथुन शिल्पे, कमल पुष्प, बुद्धमूर्ती, नाग, चक्र, आदींचे अलंकरण केले आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूस गजशिल्प कोरलेले असून त्यातील डाव्या बाजूचे शिल्प खंडित झाले आहे. लेण्याच्या मागील बाजूस एक शैलकृत स्तूप आहे. या व्यतिरिक्त अन्य लेणी सामान्य, अलंकरण विरहित आहेत. कुडा लेण्यांची स्थापत्य शैली हि कार्ले लेण्यांशी मिळती जुळती आहे, परंतु हि लेणी इसवी सणाच्या दुसऱ्या, तिसऱ्या शतकात कोरलेली आहेत. कुडा लेणी निर्माण करण्यास दिल्या गेलेल्या दानधर्माचा उल्लेख येथे कोरलेल्या अभिलेखात केलेला आढळतो. या तीसपेक्षा अधिक अभिलेखांत बौद्ध भिक्खू, सामान्य उपासक यांच्याबरोबर मंत्री, लेखक, वैद्य, सावकार, फुलविक्रेते यांचे अभिलेख उल्लेखनीय आहेत. या लेण्यांतील शिलालेखांत सातवाहनांचे प्रतिनिधी “सामंत” , “महाभोज” आणि “महारथी” यांचे उल्लेख आहेत. या लेणीसमूहाची निर्मिती इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून ते चौथ्या शतकापर्यंत केली होती.
जाण्याचा मार्ग –
अलिबागपासून मुरुड ५० किमी अंतरावर आहे, मुरुडपासून पुढे २६ किमी अंतरावर राजपुरीच्या दिशेने कुडे मांदाड बंदर आहे. येथे ह्या लेण्या पाहावयास मिळतात.
- अलिबाग मुरूड अंतर : ५० किमी,
- पुणे-मुरुड अंतर १५० किमी,
- मुंबई-मुरुड अंतर १५० किमी
जवळचे आकर्षण –
Amenities
- Bike Parking