मुरुडपासून राजपुरीकडे जाताना एकदरा नावाचे छोटे गाव लागते एका छोट्याश्या टेकडीवर वसलेले हे गाव बहुतांशी कोळी बांधवांच्या वस्तीने भरलेले आहे. याच टेकडीच्या मागच्या बाजूला एक छोटीशी जेट्टी आहे येथून समोरच जंजिरा किल्ला दिसतो व येथून जंजिरा किल्ल्यात जायला छोट्या बोटी सुद्धा उपलब्ध असतात,
एका बाजूला मोठ्ठाली टेकडी, टेकडीवर चरणारी गुरे, दुसऱ्या बाजूला समुद्र आणि समुद्रामध्ये मधोमध जंजिरा किल्लाअसे अतिशय विहंगम व रमणीय दृश्य येथून दिसते. नितांतसुंदर निसर्ग, निरव शांतता, लागूनच असलेला अथांग समुद्र, आणि किनाऱ्याला खळाळणाऱ्या लाटा, मधूनच एखादी मासेमारीसाठी येणारी बोट, शहरातील गजबजाटातून पूर्णपणे वेगळया दुनियेत गेल्याचा भास होतो. येथील खोल समुद्रामध्ये कधीकधी छोट्या डॉल्फिनचे सुद्धा दर्शन होते.
येथून सूर्यास्त पाहणे हि तर एक पर्वणीच असते. इतर समुद्रकिनाऱ्यावर क्षितिजावर पूर्णपणे समुद्र असतो पण येथे अर्धा समुद्र व अर्धी टेकडीची किनार आणि त्यामधोमध अस्तास जाणारा सूर्य, आणि खाली असलेल्या दगडी कातळावर पडलेले प्रतिबिंब. जाणकार आणि उत्सुक छायाचित्रकार हे निसर्गाचे दुर्मिळ Landscape आपल्या कॅमेरा मध्ये कैद करण्याचे सुख अनुभवू शकतात.
जवळील आकर्षणे –
- जंजिरा किल्ला (४ किमी )
- खोकरी घुमट (७ किमी )
- मुरुड समुद्रकिनारा (४ किमी )