रामनाथ भागातील हिराकोट नावाचा छोटासा भुईकोट किल्ला कान्होजी आंग्रेनी १७२० साली बांधला. या किल्यात आंग्रेंचा खजिना असे. आज तेथे कारागृह आहे. किल्ला बांधायला किल्याच्या समोरील काळे दगड व माती वापरण्यात आले आणि त्यामुळेच हा हिराकोट तलाव निर्माण झाला.
ह्या तळ्याभोवती काही वर्षांपूर्वी येथील नगरपालिकेने छान सुशोभीकरण केले आहे. येथे काही प्रमाणात अलिबाग व सभोवतालच्या ऐतिहासिक घटना सुद्धा लिहिल्या आहेत. तळ्यामध्ये व तळ्याजवळच असलेले नवीन कारंजे तळ्याची शोभा अजून वाढवतात. तळ्यामध्ये वर्षभर पाणी उपलब्ध असते. वर्षातून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी च्या पूर्वसंध्येला येथे फार आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. अलिबागच्या मुख्य समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या १ किमी अंतरावर हे तळे आहे. तळ्याभोवतालचा परिसर अतिशय शांत आहे. याच तलावाजवळ समुद्रकिनारी एक सुंदर बगिचा विकसित करण्यात आला आहे, समुद्रकिनाऱ्यावरील रम्य संध्याकाळ येथून खूप छान अनुभवता येते
अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे शासकीय दृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे. व बरीच महत्वाची शासकीय कार्यालये ह्याच तळ्याच्या परिसरात आहेत. तळ्याजवळच असलेला हिराकोट किल्ल्याचे रूपांतर आता तुरुंगात झालेले आहे. हा किल्ला बाहेरून पाहता येतो.