सम्राट अशोकाच्या काळापासून अपरान्त अर्थात कोकण या भागाचा उल्लेख आढळतो. कोकणचे साधारणतः ४० हजार वर्षापूर्वीचे पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व काही पुरातन उपकरणांवरून सिद्ध झाले आहे. रायगड जिल्ह्याला लोहयुगापासून इतिहास आहे. या भूप्रदेशावर मौर्य, सातवाहन, क्षत्रप, त्रैकूटक, कलचुरी, कोकणचे मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, बहमनी, गुजरातचे सुलतान, अहमदनगरची निजामशाही, पोर्तुगीज, सिद्धी, मराठे, मुघल, आंग्रे व ब्रिटिश अशा राजवटींनी राज्य केले.
Visit Websiteमहाराष्ट्राच्या पश्चिमेला कोकण किनारपट्टी वर रायगड जिल्ह्यात अलिबाग आहे. सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी “अलिबाग” शहर वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव “कुलाबा” जिल्हा असे होते. रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे त्यावेळी अष्टागरे म्हणून ओळखली जात. त्या काळात येथे बऱ्याच लढाया झाल्या. १७२२ मध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांनी कुलाब्यावर एकत्रित हल्ला केला होता, पण ते ती लढाई हरले होते. १८५२ मध्ये अलिबागला तालुक्याचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले.
अरबी समुद्राच्या काठावर बसलेले “अलिबाग” शहर पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचा गोवा म्हणून अलिबाग ओळखले जाते. पूर्वी चौल बेटावरील खाडी जवळ हे गाव वसलेले होते. हि वेगवेगळी बेटे नंतर रस्ते व पुलाच्या साहाय्याने जवळ आली व एकसंघ शहरात रुपांतरीत झाली.चौल हे त्याकाळी प्रमुख बंदर होते, या बंदरामुळे हा परिसर प्रसिद्ध होता आणि महत्वाचा देखील होता. १७ व्या शतकात या परिसराला अलिबाग हे नाव मिळाले. पूर्वीच्या काळी रामनाथ हे या परिसारातील मुख्य गाव होते. या परिसरात असलेल्या राम मंदिरामुळे रामनाथ हे नाव प्रचलित झाले. हेच मुख्य गाव असल्यामुळे गाव देवीचे मंदिर देखील रामनाथ येथेच आहे. शहराच्या आसपास असलेल्या वाड्या आणि बागांमुळे या गावाला अलिबाग हे नाव दिले गेले असल्याची शक्यता आहे.
अलिबागचा शहराचा इतिहास आणि उत्कर्ष :
अलिबागला नवे रूप आले ते सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात. या काळात अलिबागचा खऱ्या अर्थाने विकास झाला. बेटावरील परिसराचा विकास त्यांनी संपन्न अशा शहरात केला. याच काळात रस्ते, मंदिरे बांधली गेली तसेच जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला गेला. समुद्राच्या तटा नजीक कुलाबा किल्ल्या लगत “अलिबाग” हे सुंदर शहर वसले गेले. या परिसराचा काया पालट झाला. अनेक बांधकामे , विकासाची कामे आंग्रेच्या काळात पूर्णत्वास आली.अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार झाले यात मारुती मंदिर, बालाजी मंदिर, राम मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, काळंबिका मंदिर, गणपती मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, दत्त मंदिर, विष्णू मंदिर यांचा सामावेश आहे. अलिबाग मध्ये हिंदू प्रमाणे मुस्लीम, ख्रिस्ती धर्माचे लोक आहेत. इथे मंदिरांप्रमाणेच प्राचीन काळातल्या मशिदी देखील आहेत. तसेच इथे प्राचीन चर्च देखील आहे. अलिबाग किनाऱ्या जवळ कुलाबा किल्ला आहे. तसेच शहरात हिराकोट किल्ला देखील आहे. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे आरमार प्रमुख झाले. त्यानंतर अलिबागचा खरा विकास झाला. परंतु कान्होजी आंग्रे यांचे निवास कुलाबा किल्ल्यातच होते. आरमार, पागा तसेच राजवाड्या साठी व खजिन्या साठी त्यांनी अलिबागची निवड केली होती. त्यामुळे या शहराला एतिहासिक महत्व आहे.
१८३९ मध्ये आंग्रे संस्थान खालसा झाले व तेथे इंग्रजांची सत्ता आली. १८४० मध्ये अलिबागला कुलाबा एजन्सीचे मुख्यालय करण्यात आले. व १८५२ साली आलिबाग हे तालुक्याचे ठिकाण झाले. मुंबई बंदरा पासून जवळ असल्यामुळे समुद्र मार्गाने होणाऱ्या हलचाली साठी अलिबागला महत्व होते. सन १८६९ मध्ये कुलाबा जिल्ह्याची निर्मिती झाली व या जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे करण्यात आले.
पुढे कुलाबा जिल्ह्याचे “रायगड” जिल्हा असे नामकरण झाले तरी मुख्यालय अलिबाग येथेच राहिले. कुलाबा किल्ल्य्याची निर्मिती शिवाजी महाराज यांनी १६६२ साली केली त्यानंतर दर्या सारंग व दौलत खान यांनी इथून कारभार पाहिला त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इथला कारभार सांभाळला. अलिबाग शहरात हिराकोट किल्ला खजिन्याच्या ठिकाणा साठी कान्होजी आंग्रे यांनी बांधला. तिथेच हिराकोट तलाव बांधण्यात आला. या किल्ल्याची तटबंदी मजबूत आहे. तिथे आत देवीचे मन्दिर आणि दर्गा आहे व बाहेर मारुती मंदिर आहे. तसेच इथे आंग्रे काळात टाकसाळ होती. अलिबाग शहराला ऐतिहासिक पार्श्व भूमी लाभली आहे. आंग्रे यांचा राजवाडा या ठिकाणी आहे. तसेच आलिबाग शहरात हिराकोट किल्ल्या पासून जवळच चुंबकीय वेधशाळा आहे. १९०४ साली या वेधशाळेची स्थापना झाली असून हि इमारत पूर्णत: दगडी आहे बांधकाम करताना लोखंडाचा वापर न करता विशिष्ट पद्धतीने बांधली गेली आहे. पृथ्वी वरील चुंबकीय शक्ती होणार्या बदलाची नोंद घेणारी हि वेधशाळा विज्ञानाचा अनोखा नुमुना असून जागतिक दर्जाची आहे.
अलिबाग मुंबई पासून जवळ असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ इथे वर्षभर सुरु असते.
इथला सुंदर समुद्र किनारा, हिरवागार संपन्न निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. समुद्रात असलेले जलदुर्ग, पुरातन मंदिरे, वेधशाळा, पुरातन वास्तू, पुरातन अवशेष यामुळे अलिबागला इतिहास प्रेमी, पुरातन वास्तू अभ्यासक, विज्ञान व भूगोलाचे अभ्यासक हि भेट देण्यासाठी येतात. मुंबई व पुण्या पासून जवळ असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून अलिबाग दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे.
काही ऐतिहासिक घडामोडी
- रायगडच्या ऐतिहासिक शौर्यपटलावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरखेल कान्होजीराजे आंग्रे आणि पेशवे यांच्या शौर्याचा अनन्यसाधारण आलेखच कोरला आहे.
- रायगडच्या आधुनिक काळात वैचारिक जागृतीची प्रक्रिया गतिमान झाली. त्यामध्ये ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा पुरस्स्कार करणारे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महाडचे विष्णू भिकाजी गोखले, पेणचे प्रभाकरकार गोविंद विठ्ठल कुंटे, अस्पृश्यता विरोधी विचारांचे विष्णुबुवा ब्रह्मचारी, परिवर्तनवादी समाज सुधारक नारायण सदाशिव मराठे तथा स्वामी केवलानंद सरस्वती , राणी लक्ष्मीबाईंच्या झाशीच्या संग्रामाचे प्रत्यक्षदर्शी वरसईचे वेदशास्त्र संपन्न विष्णुभट्ट गोडसे आदींचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
- शिरढोणचे सशस्त्र क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे योगदान क्रांतीची व्याख्या निश्चित करणारे आहे
- स्वातंत्र्य आंदोलनाचा धगधगता इतिहास येथे आहे
- लोकमान्य टिळक आणि गोपालकृष्ण गोखले यांच्या राष्ट्रवादी विचारसरणीचे, महादेव बल्लाळ नामजोशी आणि शिवराम महादेव परांजपे हे सहकारी येथे सक्रिय होते.
- वैचारिक आणि राष्ट्रीय चळवळीत तळ्याचे जेष्ठ कादंबरीकार वामन मल्हार जोशी , बंधू नारायण मल्हार जोशी , आत्माराम महादेव आटवणे, माधवराव गोसावी, रामभाऊ मंडलिक, विष्णू गोविलकर, विठ्ठल ताम्हणकर हे अग्रणी होते.
- महात्मा गांधींनी १ ऑगस्ट १९२० रोजी पुकारलेल्या असहकार आंदोलनामध्ये अलिबागचे माधवराव गोसावी, वामन गोविंद लिमये आणि जेष्ठ गांधीवादी पत्रकार गणेश भास्कर पंडित यांचे योगदान महत्वाचे होते.
- पाचाड (रायगड ) येथील गुहांमध्ये सापडलेली गारगोटीची उपकरणे कोकणात चाळीस हजार वर्षापूर्वीचे पुराष्मयुगीन मानवी अस्तित्व सिद्ध करतात
- रायगडच्या या भूमीने मौर्य, सातवाहन, क्षत्रप, त्रैकूटक, कलचुरी, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव , बहमनी, गुजरातचे सुलतान, अहमदनगरची निजामशाही, पोर्तुगीज, सिद्धी, मराठे, मुघल, आंग्रे, आणि ब्रिटिश या १९ राजवटी पहिल्या आहेत
- एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर जिल्ह्याचा आधुनिक कालखंड सुरु झाला. तर विसाव्या शतकाच्या प्रारंभास सामाजिक अभिसरण आणि राजकीय जागृतीचा प्रारंभ झाला.
- रायगड जिल्ह्याचा इतिहास प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ अशा तीन काळात विभागलेला आहे
ऐतिहासिक ठिकाणे
अलिबागच्या आसपासची काही ऐतिहासिक ठिकाणे पहा.
अलिबागची चुंबकीय वेधशाळा
कान्होजी आंग्रे समाधी
आक्षी स्तंभ आणि साखरखाडी पूल
चौल येथील घुमटी
इतिहासाचे साक्षीदार
अलिबाग परिसरातील ऐतिहासिक गोष्टी