Sign In

गणेशोत्सव

गणेशोत्सव

कोकणातील प्रत्येकाला गणपती उत्सव म्हणजे अतिशय प्रिय. कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही असो गौरी गणपती च्या सणाला गावी परतून येतो. पोटा साठी आपल्या मूळ गावापासून दूर असणारी माणसे आपल्या गावी आपल्या माणसात परत येतात. आणि गावातल्या घराला घरपण येते. सण उत्सव म्हणजे नियमित दिनक्रमातून मिळालेला ब्रेक. कधीतरी होणारा हा बदल प्रत्येकाला हवा असतो.

पेणचे गणपती :-

अलिबाग जवळ असलेल्या पेण या गावात गणपतीचे अनेक कारखाने आहेत. इथले मूर्तिकार कलाकार वर्षभर आधी मूर्ती बनवण्यास सुरुवात करतात. वंश परंपरेने मूर्ती बनवणे शिकलेल्या या कलाकारांच्या हातात जादू आहे. त्यानी बनवलेल्या मूर्तींना देशभरात सर्वत्र तसेच परदेशातून ही मागणी आहे. शाडू मातीची सुबक मूर्ती, सुंदर रंगसंगती आणि कलाकारांच्या हातून साकारलेले मूर्तीचे डोळे या मुळे पेण ची मूर्ती उठून दिसते. या देखण्या गणपती मूर्ती पहाताना मन मोहून जाते प्रत्यक्ष परब्रम्ह साकार रुपात अवतरल्याचा भास होत असतो. या कलाकारांच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो. अजूनही हि कला जिवंत आहे अजूनही एक पिढी दुसर्या पिढीला कलेचा वसा देत आहे. या उत्सवा निमित्त या कलाकारांची कला घरोघर पोहोचते आणि त्यांचा चरीतार्थ चालतो.

गणपतीची तयारी :-

गौरी-गणपती म्हणजे तर उत्साहाला उधाण येते. अलिबाग मध्ये तर हा सण मोठया दिमाखात साजरा होतो. दूर दूर कामासाठी गेलेले गावकरी आपल्या मूळ गावी येतात. गौरी-गणपतीची तयारी फार आधी सुरू होते घराला रंग लागतो. घरातली माणसे एकत्र येऊन गणपतीची आरास करण्यास सुरुवात करतात. एक महिना आधीच गणपतीची मूर्ती बुक केली जाते. घराचा कानाकोपरा स्वच्छ होतो. एरव्ही एकांत वासात असलेला वास्तुपुरुष सुखावतो आणि चहूबाजूने घरादाराला दृष्टी येते. जमेल तसा आपला उत्सव आनंदी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. अलिबागमध्ये सार्वजनिक गणपती उत्सव सुद्धा केला जातो. सर्व कार्यकर्ते जोरदार तयारीला लागतात. विविध देखावे सादर केले जातात.

गणपती उत्सव :-

वाजत गाजत गणपती घरी येतात. व पहिल्या दिवशी गणपतीची यथासांग पूजा व प्रतिष्ठापना होते. येथे बरेच ठिकाणी सकाळी लवकरच पुजारी / भटजी घरोघरी जाऊन पूजा सांगतात. घरोघरी गणपतीची गाणी चालू असतात, व पूर्ण भक्तिमय वातावरण असते. अलिबागला अजूनही बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंबपद्धती दिसून येते. गणपतीची पूजा झाल्यावर घरातील स्त्रिया जेवण बनवायला घेतात. उकडीचे मोदक तसेच अजून काही गोड पदार्थ बनवले जातात. घरातील सर्व माणसे मिळून दुपारी गणपतीची आरती करतात येथे सर्व घरे जवळ जवळ असल्याने आजूबाजूच्या ४,५ घरातील माणसे आपल्याकडे आरतीला येतात व सर्व मिळून आरती म्हणतात. नंतर जेवणाची पंगत बसते.

सगळी नाती एकत्र येतात, माणसांची गर्दी होते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरा आणि संस्कार झिरपत जातात. विचारांची देवाणघेवाण होते. गप्पा टप्पा, हसणे खिदळणे यातून मनावरची जळमटे नाहीशी होतात. सहवासातले आनंद वाढत जातात. एकत्र जेवण शिजते, मदती साठी चार हात तयार होतात. मिळून मिसळून स्वयंपाक केला जातो.  तयारी लगबग, मखर सजते, आरास केली जाते. मूर्ती आणली जाते. गणपतीची स्थापना केली जाते. नैवेद्य अर्पण केला जातो. हसत खेळत मोठी माणसे व मौज मस्ती करत लहान मुले जेवतात. रोज नवा पदार्थ मोदक, उंबर, खीर, साखरभात, पुरणपोळी, एक ना अनेक पारंपारिक पदार्थ, अळूवडी, अळूभाजी, वालाचे बिर्डे, अनेक आवडते पदार्थ जिभेवर रेंगाळत राहते. वर्षभर घड्याळाला पाय बांधून जगणाऱ्या मुंबई पुण्या कडच्या चाकरमान्यांना देखिल आपल्या माणसांसाठी वेळ मिळतो. जागरण पारंपारिक खेळ, भजने, सामुदायिक आरती, प्रत्येकाच्या घरी गणपती पहायला जाणे यात मजा असते. 

नैवेद्य आणि खाद्यपदार्थ :-

गणपती जशी बुद्धीची देवता आहे तसेच गणपतीला विविध प्रकारचे नैवेद्य सुद्धा फार प्रिय. सर्वात प्रिय म्हणजे उकडीचे मोदक. अलिबागमध्ये घराघरात उकडीचे मोदक नैवेद्यासाठी बनवले जातात. पाहिल्यादिवशी यथासांग पूजा करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविला जातो. व नंतर प्रत्येक दिवशी वेगळा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून केला जातो. गणपतीला जोडून ऋषी पंचमी येते, या दिवशी तेल व कुठल्याही प्रकारचे मसाले न टाकता एक मिक्स भाजी बनवली जाते. यामध्ये जास्तकरून पालेभाज्या असतात. हि भाजी फारच पौष्टिक असते. या दिवशी परंपरेप्रमाणे कुठल्याही जीवास कष्ट न देता पिकवलेले धान्य व भाज्या खातात. या सर्व खाद्यपदार्थांना पायनु असे म्हणतात.भात शिजविताना सुद्धा तांदूळ वेगळे लावलेले असतात ज्यांना बैलांचा नगर वापरलेला नसतो.

गणपती आणि गौरी :-

गणपती सोबत गौरी घरी येते घरदार आनंदून जाते. माहेर वाशीण घरी आली म्हणून संपूर्ण घर स्वागताला सज्ज होते. गौरीच्या जेवणासाठी घरात दिवाळी केली जाते कितीतरी पदार्थ, नेवेद्य सुवासिनी ओवसायला येतात. घागरी फुंकल्या जातात झिम्मा, फुगडी, पिंगा अनेक खेळ खेळले जातात माहरवाशिणी लेकी आणि सासरकरणी सुना एकत्र येतात खेळ रंगतात. रात्र जागविली जाते. सगळीकडे आनंदीआनंद असतो. सुख आणि समाधान उत्साह असतो. जो तो अनुभव घेत असतो या आनंदात सहभागी होत असतो.

सरते शेवटी विसर्जनाचा दिवस येतो. अंतःकरण जड होते. पण सुरुवात असते त्या गोष्टीला शेवटही असतो आणि असावा कुठे तरी थांबणे क्रमप्राप्त असते म्हणूनच प्रत्येक जण आपापल्या बाप्पाला निरोप देतो. पुढच्या वर्षी लवकर या ! असे देखील आवर्जून आमंत्रण देतो. विसर्जन आहे म्हणून दरवर्षी स्थापना आहे. नावीन्य आहे. ओढ आहे. वाट बघण्यातला आनंद आहे.

माणसे जगून घेतात भरभरून हे मिळालेले क्षण आणि मग लागतात पुन्हा आपल्या कामाला. पुन्हा बांधून घेतात घड्याळाला पाय आणि पुन्हा मग्न होतात आपल्या नियमित दिनक्रमात. पण आता उत्साह असतो. मिळालेला एक ब्रेक ताजेतवाने करते आयुष्य आणि सज्ज होतात माणसे आव्हाने पेलायला..

.म्हणूनच सण हवेत, उत्सव हवा आणि माणसाला पुन्हा नव्याने जगण्याची प्रेरणा देणारे आनंद सोहळे हवे असतात.

श्री गणेशउत्सव २०२३

  • 154
  • Festivals
  • Comments Off on गणेशोत्सव

Sign In अमेझिंग अलिबाग

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password