अलिबागपासून जवळच डोंगराळ परिसरात असलेले हे अजून एक निसर्गरम्य ठिकाण. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य फारच अप्रतिम असते. ट्रेकर्स चे आवडते ठिकाण. पावसाळी सहलीचे आवडते ठिकाण. चहुबाजूने डोंगराने वेढलेले असे हे “रामधरणेश्वर”.
जाण्याचा मार्ग :-
रामधरणेश्वर ला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत, पैकी एक वायशेत गावातून सायमन कॉलनी मार्गे आणि दुसरा बामणोली/भुते गावातून.. ह्या दोन सोईस्कर वाटा आहेत.बामणोली मार्गे गेल्यास अगदी डोंगर पायथ्यापर्यंत गाडी पोचते.नंतर मात्र चालत जावे लागते.
पंधरा ते वीस मिनिटे चढाई केल्या वर डाव्या हाताला एक छोटीशी पाझर विहीर लागते. विहिरीच्या पलीकडे वरच्या बाजूला रामधरणेश्वर पाझर तलाव आहे, याच तलावाचे पाणी पाझरून या विहिरीत येते. उन्हाळ्यात डोंगर चढताना दमछाक होते तेव्हा हि थंडगार व स्वच्छ पाण्याची विहीर म्हणजे सुखद आश्चर्य असते. विहिरीचे थंडगार पाणी चेहऱ्यावर मारायचे व पुढच्या वाटेला लागायचे. साधारणतः पुढे १० मिनिटे चढण चढल्यावर आपण डोंगरपठारावर पोचतो आणि आई एकवीरा देवीचे छोटेखानी मंदिर दृष्टीस पडते . मंदिराचा मागच्या बाजूला रामधरणेश्वर पाझर तलाव आहे. डोंगर पठारावर असलेला हा तलाव सुद्धा पाहण्यासारखा आहे. पावसाळ्यामध्ये हा तलाव तुडुंब भरून वाहू लागतो, व पलीकडे याच पाण्याचा सुंदर धबधबा तयार होतो.
वायशेत सायमन कॉलनी चा रस्ता सुद्धा आपण येथेच पोचतो. या ठिकाणाहून पुर्वेकडे पायवाटेने चालत राहायचे मग लागतो पाण्याचा कातळी ओढा. उन्हाळ्यामध्ये हा ओढा सुकलेला असतो, परंतु पावसाळ्यामध्ये याचे दृश्य फारच सुंदर दिसते. हा ओढा पार करून उजवीकडे न जाता डाव्या बाजूच्या पायवाटेने पुढे चालत राहायचे कि अजून साधारणतः २० ते ३० मिनिटात आपण रामधरणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोचतो.मंदिर उंच टेकडीवर आहे येथुन उजवीकडे सरळ चालत गेल्यास आपण पुढे भवानी मंदिर आणि रामधरणे किल्ल्याकडे जातो .. मंदिरात जाण्यासाठी आपल्या ला डावीकडे जाणारी पायवाट धरावी लागते, दहा मिनिटांची चढण चढून आपण मंदिरात पोहोचतो..
रामधरणेश्वर मंदिर :-
मंदिरात मंडपात दारातच नंदी दिसतो. डावीकडे गणेशाची मूर्ती आणि आतमध्ये गाभाऱ्यात शंकराची पिंडी पार्वतीची मूर्ती आहे, या सर्व मूर्ती आणि शिवपिंडी गंडकी पाषाणात घडवलेल्या आहेत. मंदिरासमोर एक छोटे तुळशीवृंदावन आहे व अखंड पेटणारी धुनी सुद्धा दिसते.
मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला काही पुरातन मूर्ती ठेवलेल्या दिसतात, यामध्ये पाषाणातील कोरलेलं नंदी आहेत व एक मारुतीरायाची मूर्ती सुद्धा आहे. येथील विशेष आकर्षण म्हणजे जांभ्या दगडात कोरलेली शंकराची पिंडी . आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व पुरातन मंदिरामध्ये ज्या शंकराच्या पिंडी दिसतात त्या सर्व काळ्या पाषाणात घडविलेल्या आहेत, परंतु येथे जांभ्या दगडातील कोरलेली दुर्मिळ पिंडी पाहावयास मिळते.
मंदिर डोंगरमाथ्यावर असल्याने चारही बाजूचा परिसर अगदी दूरवर नजर जाईपर्यंत दिसतो. पश्चिमेला वरसोली चा समुद्रकिनारा, अलिबाग, किहीम, सासवणे इ ठिकाणे दिसतात. रामधरणेश्वर पाझर तलाव इथून व्यवस्थित पाहायला मिळतो.पुर्वेकडे भवानी मंदिर आणि रामधरणे किल्ला दिसतो.
भवानी देवी आणि रांजणखळगे –
मंदिरातून समोर पुर्वेकडे खाली उतरून भवानी मातेचे मंदिरात पोहोचता येते. हा मार्ग तीव्र उताराचा आणि निसरडा आहे . शक्यतो आल्या मार्गाने खाली उतरावे व मंदिर टेकडीला वळसा घेत भवानी मंदिर गाठावे ..भवानी मंदिराजवळून एका ओढ्याच्या पात्रामध्ये आम्हाला काही छोट्या आकाराचे ४ ते ५ रांजणखळगे सुद्धा आढळून आले. अलिबागच्या परिसरामध्ये असे रांजणखळगे शक्यतो कुठे आढळल्याचे ऐकिवात नाही.
रामधरणेश्वर किल्ला –
भवानी मंदिराच्या पुढे पुर्वेकडे २० मिनिटांत रामधरणेश्वर किल्ला गाठता येतो , किल्ल्याचे फार कमी अवशेष शिल्लक आहेत. मंदिर व आसपासचा परिसर शांत असल्यामुळे येथे नानाविध प्रकारचे पक्षी आणि त्यांचा किलबिलाट निरंतर ऐकू येतो. परतीच्या प्रवासात आम्हाला काही दुर्मिळ पक्षाचा आवाज ऐकू आला.
Lavha bombs –
डोंगर पायथ्याशी गोल आकाराचे बरेच दगड आढळून येतात, या डोंगराच्या निर्मितीच्या वेळी लाव्हा रस हवेत उडून तो थंड झाल्यावर हे वैशिष्ट्य पुर्ण गोलाकार दगड तयार झालेलं असावेत.
कसे पोहोचाल?
येथे जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत, पैकी एक वायशेत गावातून सायमन कॉलनी मार्गे आणि दुसरा बामणोली/भुते गावातून.. ह्या दोन सोईस्कर वाटा आहेत.बामणोली मार्गे गेल्यास अगदी डोंगर पायथ्यापर्यंत गाडी पोचते. नंतर मात्र चालत जावे लागते.
- अलिबाग बामणोली – ४ किमी
- अलिबाग वायशेत – ६ किमी
- अलिबाग पुणे :- १४५ किमी
- अलिबाग मुंबई :- १२० किमी
जवळचे आकर्षण –
- खांदेरी किल्ला (७ किमी )
- वरसोली समुद्रकिनारा (८ किमी )