अलिबाग ते नागाव हा रस्ता फारच मनमोहक आहे, दुतर्फा गर्द झाडी आणि थोड्या थोड्या अंतरावर असलेली हि पुरातन मंदिरे,आणि बहुतेक मंदिरांसमोर असलेली पुष्करिणी. असेच एक मंदिर म्हणजे नागावमधील श्री भीमेश्वर.
इतिहास –
सदाशिवराव भाऊ पेशवे यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या सहकार्याने या मंदिराचा जिर्णोद्धार १७५८ साली करण्यात आला. श्री विठोबा लोंढे यांनी मंदिरासमोर जिर्णोद्धारानन्तर एक दीपमाळ बांधली. मंदिरासमोरील पुष्करिणी साधारणतः १७६४ मध्ये नारंभट रिसबूड यांनी बांधली. याच मंदिराजवळ साधारणतः श के १२८८ सालचा एक शिलालेख सापडतो.
मंदिर –
कौलारू दुमजली असलेल्या मंदिराच्या दोन बाजूला व्हरांडा असून मध्यभागी सभामंडप आहे. सभामंडपावर एक छोटासा मजला असून वर कौलारू छप्पर आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोरच दगडी नंदी दिसून येतो व चार लाकडी लक्षीदार खांबांवर असलेला सभामंडप दिसतो. मुख्य गाभार्याच्या डावीकडे गणपती तर उजवीकडे कालभैरव अशा मूर्ती दिसतात. सभामंडपाच्या डावीकडे एक अजून गाभारा असून त्यामध्ये मूर्ती आहे.
गाभाऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार दगडी असून त्यावर खूप सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या वरती मध्यभागी ज्याला ललाट बिंब म्हणतात तेथे गणपती आहे. आणि त्यावर श्री विष्णूची मूर्ती आहे. तर खाली दोन बाजूला दोन कीर्तिमुखे आहेत. गाभाऱ्यामध्ये उतरल्यावर मधोमध शंकराची पिंडी दिसते तर मागच्या बाजूला पार्वतीची मूर्ती आहे. गाभारा पूर्णपणे दगडी आहे. गर्भगृहावर एक दगडी नक्षीदार घुमट आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ असून चार जुनी तुळशी वृंदावने आहेत. आणि त्यापलीकडे पुष्करिणी. मंदिरामध्ये एक जुनी श्री विष्णू व कालभैरव अशा दोन मूर्ती ठेवल्या आहेत. मंदिरासमोरील पुष्करिणी स्वच्छ करताना या मूर्ती मिळाल्या असे तेथील पुजारी सांगतात.
पुरातन शिलालेख –
या मंदिराचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे साधारणतः श के १२८८ सालचा एक शिलालेख सापडतो. हा शिलालेख मंदिराच्या डाव्या बाजूच्या पायऱ्यांवर बसविलेला आहे. हा शिलालेख अठ्ठावीस ओळींचा असून संस्कृतमध्ये लिहिला आहे. हा शिलालेख २ फूट ४ इंच लांब आणि १ फूट ६ इंच रुंद असून हिजरी ७६७ आणि श के १२८८ सालचा आहे.
Amenities
- Bike Parking
- Car Parking
- Friendly workspace
- Good for Kids