About Alisa Noory
पर्यटन स्थळ म्हणून “अलिबाग” नावारूपाला येत आहे. इथले सुंदर समुद्र किनारे आणि मोहून टाकणारा निसर्ग इथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडतो. रस्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या नारळी पोफळीच्या बागा अलिबागच्या सौदर्यात आणखी भर टाकतात. इथल्या शांत सुंदर निसर्गाची भुरळ पर्यटकांना पडली नाही तरच नवल. ऋतू प्रमाणे इथला निसर्ग देखिल आपले रूप बदलत असतो. ऋतूनुसार विविध रंगांची, गंधाची फुले फुलतात आणि इथला सुंदर निसर्ग आणखी सुदंर दिसू लागतो. परसात, बागेत, रस्त्यात गंध आणि रंग पसरवत मुक्त हस्ते फुलणारी विविध फुले पहाणे म्हणजे डोळ्यांना सुख असते. निसर्ग रम्य अलिबागला फुले आणि फळांचा प्रदेश म्हंटले तरी त्यात काही वावगे ठरणार नाही.
कोकणच्या माणसांना फुलांची आवड असते म्हणूनच कुंपणा पासून मागच्या अंगणा पर्यंत प्रत्येक घरा भोवती अनेक फुलझाडे लावलेली दिसतात आणि त्या झाडांची प्रेमाने जोपासना करणारी माणसे देखील इथे पहायला मिळतात. निसर्गावर भरभरून प्रेम करणारी ही साधी माणसे रंग आणि गंधांत रमून जातात. मनापासून आयुष्य जगणे आणि मातीशी एकरूप होणे म्हणजे काय असते ते इथल्या माणसांच्या सहवासात काही दिवस घालवल्यावरच कळू शकेल.
Visit Websiteगुलाब (Rose) :-
गर्द गुलाबी सुरेख रंगांची फुले, फिकट हिरवी मोठी पाने, मोठ्या कळ्या आणि मंद सुगंध हे कोकणातल्या गुलाबाचे वैशिष्ट. अलिबाग मध्ये प्रत्येक घराभोवती असणाऱ्या वाड्यांमध्ये पुढच्या अंगणात हमखास गुलाबाची झुडुपे आढळतात. या झडूपांना फुले गुच्छाने येतात. विशेषतः फिकट गुलाबी किंवा गडद गुलाबी रंगांची फुले असतात. ही फुले गावठी गुलाब म्हूणून प्रसिद्ध आहेत. येथील लोकल मार्केटमध्ये ही फुले परडीत विकायला घेऊन बसलेल्या महिला आपल्याला दिसतात. पूजेसाठी या फुलांचा वापर होतो. स्थानिक मंदिरांच्या गाभाऱ्याची शोभा या फुलांमुळे वाढते. गुलाब फुलांचा वापर कुरून सुंदर हार इथले फुलवाले बनवतात. या गुलाबाचा वापर गुलकंद करण्यासाठी होतो. तसेच इथल्या स्त्रिया केसात देखील गुलाब फुले माळतात. हिरव्यागार झाडावर गुलाबी रंगांची ही फुले खूप सुंदर दिसतात त्यामुळे परिसराचे सौदर्य वाढते तसेच या फुलांचा मंद गोड सुगंध मन प्रसन्न करतो. अत्तर, औषधे, सुगंधी द्रव्ये, साबण, अगरबत्ती बनवण्या साठी गुलाबाला चांगली मागणी आहे .झेंडू (Marigold) :-
अश्विन आणि कार्तिक महिन्यात आलिबाग परीसरामध्ये झेंडूची फुले सर्रास आढळतात. परसात किंवा शेताच्या बांधावर फेरफटका मारताना झेंडूची टवटवीत व ताठ देठाची फुले पहायला मिळतात. नारंगी आणि पिवळ्या रंगाची ही फुले खूपच आकर्षित दिसतात. सणासुदीला या फुलांचा होणारा वापर लक्षात घेऊन काही प्रगतशील शेतकऱ्यांनी आता झेंडूची शेती देखील करायला सुरुवात केली आहे. कुंपणा भोवती, अंगणात दसरा आणि दिवाळीच्या आसपास ही फुले फुललेली दिसतात. पूजेसाठी, सजावटीसाठी कोकण वासिय झेंडूचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. फुललेल्या झेंडूची फुले परिसरातल्या सौदर्यात भर टाकतात. झेंडूची फुले हंगामी फुले आहेत. गावठी झेंडूला गंध देखील असतो. इथले लोक या फुलांचा मखमलीची फुले असेही म्हणतात. डोंगराळ भागातही मोठ्या प्रमाणावर झेंडू लावलेला दिसतो आणि हंगामात बाजारपेठा केशरी, पिवळ्या फुलांनी सजलेल्या दिसतात.जास्वंद (Hibiscus) :-
प्रत्येक अंगणात, कुंपणा जवळ हमखास आढळणारी फुले म्हणजे जास्वंदीची फुले. जास्वंदीचे अनेक प्रकार अलिबाग मध्ये पहायला मिळतात. यामध्ये एकेरी आणि दुहेरी पाकळ्या असलेली लाल, गुलाबी, पिवळा, अबोली, पांढऱ्या रंगांची फुले मुख्यत: आढळतात. कातर पाकळ्या असणारी लाल रंगांची एक वेगळी जात देखील इथे पहायला मिळते. घराघरात पूजेला हीच फुले वापरतात. भरपूर प्रमाणात फुलणाऱ्या जास्वंदीच्या फुलांना गणपतीच्या दिवसात खूप मागणी असते.अबोली (Firecracker) :-
नाजूक फिकट नारंगी रंगाची अबोलीची फुले अलिबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. घराचे अंगण, कुपणा जवळ, बांधावर, वाड्यां मध्ये अबोली फुललेली दिसून येते. नाजूक दांडा असलेली आकर्षक फिकट नारंगी रंगांची अबोली फार सुंदर दिसते. अबोलीच्या फुलांना विशेष गंध नसतो. कोकणी माणसांना फुलांची आवड आहे. रोज डोक्यात फुले माळणाऱ्या अनेक स्त्रिया येथे पहायला मिळतील. अबोलीच्या फुलांचे गजरे, वेण्या खूप सुंदर दिसतात त्यामुळे लग्न, सण समारंभ अशा अनेक प्रसंगात अबोलीच्या फुलांना चांगली मागणी असते. ही फुले भरपूर प्रमाणात फुलतात व लगेच सुकत नाहीत त्यामुळे अंगणाची शोभा वाढवतात. गडद नारंगी, फिकट नारंगी, पिवळा अशा रंगांची अबोलीची फुले अलिबाग मध्ये पहायला मिळतात.चाफा :-
सुवर्णा सारखा पिवळा धम्मक रंग आणि वेड लावणाऱ्या गंधाचे वरदान असलेला “चाफा” म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. वाऱ्याच्या मंद झुळूके सोबत दूरवरून येणारा चाफ्याचा गंध मनाला प्रसन्न करतो. कोकणात आढळणाऱ्या फुलांमध्ये चाफ्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. येथील घराजवळ, बागेमध्ये सोन चाफ्याचे झाड असते. देव पूजेसाठी,डोक्यात माळण्यासाठी तसेच सुगंधी द्रव्ये, अत्तर, अगरबत्ती बनवण्यासाठी चाफ्याचा उपयोग होतो. सोन चाफा, पिवळा चाफा, हिरवा चाफा, पांढरा चाफा, लाल चाफा, कवठी चाफा, नाग चाफा अशा चाफ्याच्या विविध जाती आहेत. अलिबाग मध्ये या सर्व जातींची चाफ्याची झाडे दिसतात. पांढरट पिवळ्या सुवासिक फुलांची जुनी झाडे इथल्या मंदिरांच्या प्रांगणात पहायला मिळतात. आपल्या अस्तित्वाने परिसर सुगंधी व प्रसन्न करणाऱ्या चाफ्याची फुले सर्वांनाच आवडतात. कोकणी कथा, लोकसाहित्य, कविता, कादंबरी मध्ये चाफ्याच्या फुलांचा उल्लेख दिसून येतो.बकुळ :-
“बकुळ” हे कोकणात हमखास आढळणारे लोकप्रिय फुल आहे. भले मोठे झाड व त्याला येणारी कातरलेल्या पाकळ्याची पांढरी नाजूक फुले खूपच सुवासिक असतात. बकुळीचा गजरा स्त्रियांमध्ये लोकप्रिय आहे. बकुळीची झाडे उंच आणि भला मोठा विस्तार असेलेली डेरेदार वृक्ष स्वरूपात आढळतात. अलिबाग मधील कित्येक वाड्यांमध्ये बकुळीची जुनी झाडे आहेत. बकुळीच्या गावठी झाडांच्या वाढिस खूप वर्ष लागतात पण एकदा वाढ झाल्यावर उंच डेरेदार वृक्षाला भरपूर प्रमाणात फुले येतात.
अंगणात बकुळीचे झाड असेल तर संध्याकाळची शोभा अवर्णनीय असते. सायंकाळी फुलणारी बकुळ फुले वाऱ्याच्या मंद झुळूके सोबत टपटप खाली पडू लागतात व रात्रीपर्यंत बकुळीच्या झाडाखाली फुलांची पखरण पडलेली दिसते. कोकणात मोठी घरे आणि त्याभोवती सारवलेले सुरेख अंगण असते. सायंकाळी या सारवलेल्या अंगणात बकुळीच्या फुलांचा सडा पडतो आणि दूरवर गंध पसरत जातो. आकर्षक पांढऱ्या रंगांची फुले आकाशातील चांदण्या प्रमाणे वाटू लागतात ते दृश्य बघणे आणि तो गंध अनुभवणे म्हणजे स्वर्ग सुखच. अलिबाग मध्ये अनेक ठिकाणी वाड्यांमध्ये पर्यटका साठी राहण्याची घरगुती व्यवस्था आहे. अशा ठिकाणी “होम स्टे” केल्यावर हा अनुभव घेता येऊ शकतो. सुंदर निसर्ग अनुभवणे त्याच्या सहवासात रमणे हा देखील विरंगुळा आहे. बकुळीची झाडे चौल, नागाव, आक्षी, वरसोली, रेवदंडा, मुरुड येथे समुद्रा लगद्च्या गावां मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. केसात मळण्यासाठी नाजूक फुलांचे गजरे येथील बाजार पेठेत मिळतात. ही फुले सुकली तरी त्याचा सुगंध बरेच दिवस राहतो. अत्तर व सुगंधी द्रव्य, अगरबत्ती बनवण्यासाठी बकुळीच्या फुलांचा वापर केला जातो.